« Back

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना

Shilpakar Pratishthan's photo.
S

नागपूर येथील दिक्षाभूमी वरील स्तुप

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना स्पष्ट होती ती अशी की, हिंदू धर्मात अस्पृश्यांना सहानुभूतीची वागणूक मिळत नाही. जो धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कार करून माणसा-माणसांत भेद  दिलीकरतो, ज्या धर्मात स्वातंत्र्य, समता, बंधुता नाही, त्या धर्मात राहून अस्पृश्यांचा उद्धार होणार नाही म्हणून त्यांनी धर्मांतर केले पाहिजे. बाबासाहेबांचा हिंदू धर्म नि समाजव्यवस्थेला असा सवाल होता की,‘जो धर्म अस्पृश्यांना देवळात जाऊ देत नाही, प्यायला पाणी मिळू देत नाही, विद्या ग्रहण करू देत नाही, अस्पृश्यांच्या सावलीचाही विटाळ मानतो, त्या हिंदू धर्मात अस्पृश्यांनी कशासाठी राहावयाचे?' डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म त्यागाची घोषणा केली होती. बाबासाहेबांनी धर्मांतरांच्या घोषणेनंतर सलग एकवीस वर्षे विविध धर्मांचा सखोल अभ्यास केला. या काळात त्यांचा कल बौद्ध धम्माकडे वळला. धर्मांतरापूर्वी म्हणूनच मुंबईत १९४५ मध्ये स्थापन केलेल्या महाविद्यालयास त्यांनी सिद्धार्थ, तर औरंगाबादेत १९५० मध्ये काढलेल्या महाविद्यालयास मिलिंद आणि परिसरास नागसेनवन अशी नावे दिली. मुंबईतील दादर येथील आपल्या निवासस्थानालाही त्यांनी ‘राजगृह' असे नाव दिले. बाबासाहेबांना अखेर बुद्धाचा जीवनमार्ग लोककल्याण, सदाचार, समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा वाटला म्हणून त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे आपल्या अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला. त्या दिवशी अशोकविजयादशमी होती(या दिवशी सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता).हे शपथग्रहण सकाळी ९.०० वाजता झाले. महास्थविर चंद्रमणी यांचेकडूनत्रिशरण व पंचशील ग्रहण करून त्यांनी धम्मदीक्षा घेतली. व आपल्या अनुयायांना बावीस प्रतिज्ञांद्वारे संदेश दिला. बावीस प्रतिज्ञा खालीलप्रमाणे आहेत:

1. मी ब्रह्मा, विष्णु, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.

2. राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.

3. मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.

4. देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.

5. गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो.

6. मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.

7. मी बौद्धधम्माच्या विरुद्ध व विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.

8. मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.

9. सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.

10. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्नू करीन.

11. मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.

12. तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.

13. मी सर्व प्राणिमात्रांवर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.

14. मी चोरी करणार नाही.

15. मी व्याभिचार करणार नाही.

16. मी खोटे बोलणार नाही.

17. मी दारू पिणार नाही.

18. ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.

19. माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.

20. तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.

21. आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.

22. इतःपर मी बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो